दोन-सलील वाघ

सगळा जमाखर्च बघण्यासाठी

जुनी कॅलेंडरं घेऊन बसल्यावर
समजतं आपण किती निरर्थक भर्कटतो
निष्पर्ण झाडांतून सरकत जाणारा चंद्र
नदीत तरंगणारी इमारतींची प्रतिबिंबं
समुद्र आकाश टेकडया विजा सूर्य तारे
भावल्यांसारखी माणसे अन पावसाळे
हे सगळेच असतात पुन्हा पुन्हा येणारे
तरी क्षणांच्या चिमटीत पकडता आलं नाही
यातलं सगळंच आपल्याला
त्यांनी एकमेकाल दिलेल्या शिव्यांचाच
आपण अभ्यास केला इमान्दारीत
उगीच जबडे दुखावले प्रश्नांच्या बडबडीनी
अन पळ काढला खरी उत्तरं आली
तेव्हा भीतीने बसून राह्यलो
कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे
-सलील वाघ
Leave a comment

राधा:मागे उरलेली- अरुणा ढेरे

ज्याच्यावर निरवलेलं असतं स्वतःला
ते आपलं माणूस एकदाही मागे वळून न पाहता
निरोपाची काडी ओढून निघून जातं
तेव्हा उठणाऱ्या धगधगत्या जाळात
सुक्याबरोबर कितीतरी ओलं चुपचाप जळत राहत.

सर्वस्वाचा नाद गुंजत ठेवणारा
उभ्या जन्माचा वेळू बघता बघता राख हो‌ऊन जातो;
होरपळून मरतात निळ्याभोर सुखाचे मोर
आणि पाण्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर
सर्पाच्या फण्यासारखा जाळ उठतच राहतो.

काजळी पसरत राहते भवतालभर
वंचनेची जळजळ कितीक काळ तगमगत ठेवते;
चुरचुरत राहतो येणारा क्षण अन क्षण;
करपल्या प्रहरांची नुसती आग आग होत राहते

आता पुन्हा परतून ये‌ईल का उभं करता
त्या जुन्या आयुष्याच्या गोकुळाला?
कि क्षमेने तुडुंब भरलेले एखाद नातं
अनयाच्या समजुतीन पाझरत राहील जळत्या जीवावर
तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर?

-अरुणा ढेरे

Leave a comment

काटा रुते कुणाला- शांता शेळके

काटा रुते कुणाला   आक्रंदतात कोणी
मज फ़ूलही रुतावे   हा दैवयोग आहे!

सांगू कशी कुणाला   कळ आतल्या जिवाची?
चिरदाह वेदनेचा   मज शाप हाच आहे!

काही करु पहातो   रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही   विपरीत होत आहे!

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे!

-शांता शेळके

Leave a comment

मर्म-ग्रेस

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये

- ग्रेस

Leave a comment

अनय-अरुणा ढेरे

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बा‌ईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी दे‌ऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं हो‌ऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !…

-अरुणा ढेरे

Leave a comment

अकरा-सलील वाघ

पश्चिमान आकाशाच्या आत्मियतेचे
खंडकाव्यासारखे मेन्टेन्ड लयीचे
लागोपाठ दिवस
अपरिहार्य ठळकपणे
मुद्रित झालेत माझ्यावर

दिवाळीच असं नाही
कोणताही सण असो मला
भरल्या उत्सवात कुणाचीतरी
उमाळून आठव्ण आल्यासारखी होतं
पण हे मी बदलतोय
कडेवरच्या बाळासारखं
चटकन झेपावणं मी सोडलंय
कुठंही

स्वत:पेक्षा कित्येकपट वजनाची
वस्तू नेणारया मुंगीसारखं मी
स्वत:ला ओढून खेचून आणलंय
त्या दिवसांमधून फ़रफ़टत

आता चुकूनसुद्धा मला
त्यांचा संसर्ग होता कामा नये

-सलील वाघ

Leave a comment

कविता. -सदानंद रेगे

तुझ्यावर कविता.
तुझी ओळखदेख नसताही
तुझ्यावर कविता.

म्हणून तर आज
थोडी धुगधुग आहे
आजच्यापुरता तरी.
एकतार
अन गण्याच्या सरी
लगातार..

-सदानंद रेगे

Leave a comment

आधीच्या कविता (सहासष्ट)- सलील वाघ

तू आलीस
तू गेलीस
हे दोनच क्षण मी
पराकोटीचं जगलो उधारुसनवार गझला ऐकून
तुझ्या पेनचे
पडलेले टोपण
साठवून ठेवले
तुझ्या दातांच्या
वणांसकट हातांच्या
ठश्यांसकट
काळेपेन्सच्या दुकानातलं
अलौकीक अजरामर शाईपेन
फ़ुलापानांवर
आकाश
वाळवंटं
सागरं
मार्चमधल्या
गळलेल्या पानांवर
प्रतिध्वनित
खुणा
तुझ्या पेनचे टोपण
माझ्या पुराणवस्तुसंग्रहालयात
पवित्र

-सलील वाघ

Leave a comment

एकाकी- शांता शेळके

तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे

बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.

दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?

-शांता शेळके

Leave a comment

छंद घोटाळती ओठी- ना.धों.महानोर

छंद घोटाळती ओठी
नाचणभिंगरी
त्याच्या साध्या ओळीसुध्दा
झपाटती भारी

डोक्यावर हिंदळता
देह झाला गाणी
एका कवीच्या डोळ्यांची
डोळ्यांना माळणी

असे कसे डोळे त्याचे
मीही नवेपणी
मेंदी‌ओले हात दिले
त्याला खुळ्यावाणी

तेव्हापासूनचे मन
असेच छांदिष्ट
सये तुला सांगू नये
अशी एक गोष्ट:

त्याच्या ओळी माझ्या ओठी
रुंजी घालू आल्या
रानपाखरासारश्या
तळ्यात बुडाल्या.

-ना.धों.महानोर

Leave a comment